४० आमदारांचे २ हजार कोटी कुठून आले? राज ठाकरेंचे ५० खोक्यांचा उल्लेख करत फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर

Foto
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली. या युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही करप्शन आणि कन्फुजनची युती असल्याची टीका केली होती. यावर राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मुलाखत दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांच्या युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, यांचा सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे. ही बसवलेली माणसे आहेत यातला बसलेला माणूस कोणीच नाही. आणि बसवलेला माणूस फक्त धन्याचे ऐकतो. त्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येत आहोत म्हणून आणि आता सांगतायत की कोर्टात केस चालू आहे. मग द्या ना ते पुरावे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं बघायचं वाकून या पातळीवर ते आले आहेत. तुमच्याकडे काय चालू आहे ते बघा.

अनेक वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेना (ठाकरे)ची सत्ता आहे. यामध्ये असा आरोप होतो की येथे तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला, महापालिकेत एवढे पैसे असतात? आणि एवढे पैसे असतील तर आमदार ५०-५० कोटींनी का पळून गेले? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना विचारला.

यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ते जे ५० खोके-५० खोके चालू होतं. लोकांना नीट समजावून सांगणे आवश्यक आहे. ५० खोके हा विनोदाचा भाग नाही. ५० खोके म्हणजे ५० कोटी रूपये झाले. ४० आमदार म्हणजे २ हजार कोटी. ४० आमदारांचे २ हजार कोटी कुठून आले? कसे आले? बँकेतून लोन तर नव्हतं ना घेतलं? त्यामुळे कुठच्या भ्रष्ट्राचारावर कोणी काय बोलावं? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंचा बिनविरोध निवडणुकीचा मुद्दा

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवड होण्याचे प्रकार गंभीर असल्याचं नमूद केलं. ङ्गङ्घआता उमेदवार माघार घेत आहेत. या पुढची परिस्थिती अशी होईल की अमेरिकेनं जसा व्हेनेझुएलाचा अध्यक्ष उचलून नेला, तसे जिल्हाध्यक्ष आणि महापौर उचलून सूरतेला घेऊन जातील. यांनी आपले मंत्री उचलून गुवाहाटीला नेले, डोनाल्ड ट्रम्पनीही तेच केलं. जसं टेंडर प्रक्रियेत गफलत झाली तर रीटेंडर करतात, तसंच जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात तिथे निवडणुकीची प्रक्रिया नव्याने राबवली पाहिजे. बिनविरोधमध्ये विरोधकांचा एकही उमेदवार नाही?फफ असं उद्धव ठाकरे म्हणाले.